Video: गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू
वाघोलीतील घटना; अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात

वाघोली: वाघोलीतील साईसत्यम पार्क मधील गणेश नगर येथे असणाऱ्या डेकोरेशनच्या गोडावूनला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नऊ वाहनांच्या मदतीने सहा ते सात तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्नितांडवामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
बिजेन पात्रा (अंदाजे वय २८), विसावा सेन (अंदाजे वय ३३), कमल (अंदाजे २९, सर्व राहणार पश्चिम बंगाल पूर्व, मैथानीपूर) असे आगीमध्ये मृत्यु झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे-नगर रोडवरील वाघोलीतील साईसत्यम पार्क येथील गणेश नगर तेथे डेकोरेशनचे साहित्य ठेवलेले मोठे गोडाऊन आहे. लागुनच असलेल्या खोल्यांमध्ये कामगार वास्तव्यास होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास गोडवूनमध्ये १२ कामगार जेवण करत होते. शुक्रवारी (दि. ५ मे) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे कामगार भेदरले होते. काही कामगार बाहेर पळाले. तर दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर एकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गॅस सिलेंडर घेवून गोडाऊनमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. परंतु दुर्दैवाने त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. सजावटीचे साहित्य असल्याने आगीने तात्काळ पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गोडाऊनमधील चार सिलेंडर पैकी तीन सिलेंडर फुटल्याने आणखीनच आग भडकली. आग एवढी भीषण होती की लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए व पुणे मनपा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचेसह स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टॅन्कर, जेसीबी व आवश्यक ती मदत केली. लोणीकंद पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आशिष आगरवाल यांच्या शुभ सजावटीचे इव्हेंट कंपनीचे हे गोडावून होते.
आग लागलेल्या गोडाउनलगतच इंडियन गॅसचे गोडावऊन व साई बालाजी सोसायटी आहे. गोडाऊनमध्ये ४०० गॅस सिलेंडरचा साठ होता. आगीचे तांडव पाहता गॅस साठा तात्काळ येथून हलविण्यात आला. आगीमुळे लगतच असलेल्या साई बालाजी सोसायटीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या व पिव्हीसी पाईपांचे नुकसान झाले. सुदैवाने गॅसच्या गोडावून कडील भिंत उंच असल्याने आग आगीच्या झळा सिलेंडरपर्यंत पोहचू शकल्या नाहीत अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. आग नियंत्रणात आणण्यासाठी अडचण येत असल्याने दोन जेसीबीच्या सहाय्याने भिंती फोडून अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या सहाय्याने तात्काळ पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. त्याबरोबर आग गोडाऊनच्या अन्य ठिकाणी पसरत होती. भिंतीमुळे आग नियंत्रणात आणणे अग्निशमनच्या जवानांना कठीण झाले होते. त्यामूळे तात्काळ जेसीबी बोलावून जेसीबीच्या साह्याने भिंतीला छिद्रे पाडून आग आटोक्यात आणणे शक्य झाले. जवळच सोसायातील असल्याने सोसायटीतील रहिवाशी प्रचंड भीतीच्या दडपणाखाली होते. आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला – रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
गोडाऊनला साधारणतः साडे अकराच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अर्ध्या तासात घटनास्थळी पोहचलो. त्यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे लागुनच असणाऱ्या सोसायटीमधील व आसपासच्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिक सुद्धा मदतीसाठी धावपळ करत होते. आग भीषण असल्याने येथील रहिवाशी प्रचंड घाबरले होते – प्रदीप खरात (परिसरातील रहिवाशी)
आग एवढी भीषण होती की आगीचे लोट तीस ते चाळीस फूट उंच होते. सोसायटीतील रहिवाशांना सगळं संपलं असे वाटलं होते. परंतु जोराचे वारे नसल्याने आग सोसायटीकडे आली नाही. केवळ खिडक्यांच्या काचा फुटल्या व पीव्हीसी पाईप जळाले आहेत. दोन सिलिंडर फुटल्याचा व शेड कोसळल्याचा मोठा आवाज आला. एक सिलिंडर तर गोडाऊनची भिंत फोडून बाहेर आले. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशी घाबरले. जीव वाचवण्यासाठी सोसायटीतील वृद्ध, लहान मुले घेवून रहिवाशांनी सर्व सोसायटी तात्काळ खाली केली. दरम्यान माजी जि.प. सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी आमदार जगदीश मुळीक यांना संपर्क केला तसेच अग्निशामक दलाच्या कार्यालयाशी फोनद्वारे घटनेची माहिती दिली. दाभाडे व मुळीक यांनी सोसायीतील व परिसरातील रहिवाशांना धीर देत मोठी मदत केली – भरत गळगट्टे (चेअरमन, साई बालाजी सोसायटी), जालिंदर जायभाय (सोसायटीतील रहिवाशी)