रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे वाघोलीकरांकडून स्वागत; काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे - केतन भैय्या जाधव

वाघोली : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या विस्तारित मार्गिकेला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वनाझ ते रामवाडी दरम्यानच्या मार्गिकेचा प्रस्ताव अधिक काळ केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता. अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मेट्रोचे काम सुरू होणे अपेक्षित आहे.
दिवसेंदिवस शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तारही वेगाने वाढत आहे. पर्यायाने लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. शासनाच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११.७३ किलोमीटर रामवाडी ते वाघोली पर्यंत मेट्रो मार्गिकेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राज्य शासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर पंतप्रधान यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी मेट्रो मार्गिकेला बुधवारी (दि. २५ जून) मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांसह वाघोलीकरांची अनेक दिवसांपासून असलेली मागणी पूर्ण झाली असून मेट्रो हा एक प्रभावी पर्याय ठरणार आहे.
मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु झाल्यास पुणे-नगर महामार्गावर नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे. गेली अनेक वर्षांपासून वाघोलीकर दररोजच वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने वाघोली हे गाव विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याशी जोडलेले महत्वाचे केंद्र बिंदू असून पुणे शहराचे प्रवेशद्वार आहे. पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव येथे औद्योगिक वसाहत असून सणसवाडी, शिक्रापूर आदी ठिकाणी विविध कंपन्या, कारखाने, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स आहेत. कंपन्यांची वाहने, अवजड वाहने, खासगी ट्रॅव्हल्स धावतात त्यामुळे महामार्गावर वर्दळ असते. मेट्रोमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे. परंतु मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी बाह्यवळण रस्ता सुरु करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य सरकारने रामवाडी ते वाघोलीपर्यंत मेट्रो मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यांनतर राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर केंद्राने मंजुरी दिल्याने रामवाडी ते वाघोलीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु मेट्रोचे काम सुरु करण्यापूर्वी वाघोलीच्या बाजूने जाणारे पर्यायी रस्ते करणे गरजेचे आहे.
– केतन जाधव (अध्यक्ष, लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन)