लोणीकाळभोर परिसरात मटका, जुगार अड्डयावर छापा
गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई
- लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसरातील गुन्हेगारीस आळा बसण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतंत्र युनिट-६ ची स्थापना केली आहे. गुन्हे शाखा युनिट ६ कडून होता असलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारांवर चांगलीच वचक बसली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस स्टेशनच्या हद्दीत उरळी देवाची येथे सार्वजनिक ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये खेळत असलेल्या अवैध मटका, जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट ६ पथकाने छापा टाकून एकूण १५ जणांवर कारवाई केली आहे. सदर छाप्यात एकूण ९२ हजार रुपये रोख रक्कमेसह जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य व त्यांची वाहने असा एकूण १० लाख २ हजार ४४५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ शुक्रवार (दि. १८ जून) रोजी गस्तीवर असताना उरुळी देवाची (ता. हवेली) येथे जयराम ट्रान्सपोर्टच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका, जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट-६ पथकाने जुगार अड्ड्यावर अचानकपणे धाड टाकून जुगार घेणारे व खेळणाऱ्यां एकूण १३ जणांना ताब्यात घेऊन जुगार अड्डा चालविणारे मंगेश कुलकर्णी व प्रवीण मडखंब यांचे विरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणावरून ९२ हजार रुपये रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, एक चारचाकी, १२ दुचाकी वाहने असा एकूण १० लाख २ हजार ४४५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर पुणे शहरातील सर्वात मोठी कारवाई समजली जाते.
सदरची उल्लेखनिय कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, ऋषिकेश टिळेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.