कचऱ्यातून शोधली हरवलेली हिऱ्याची अंगठी
प्रामाणिकपणाबद्दल सफाई कर्मचाऱ्यांचे होत आहे सर्वत्र कौतुक

वाघोली : केसनंद भागात नियमित काम करत असताना कचऱ्यात हरवलेली हिऱ्याची अंगठी शोधण्यासाठी आदर पूनावाला क्लीन सिटीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण कचरा गाडी खाली केली. कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात हरविलेल्या हिऱ्याच्या अंगठी शोधून काढली आणि मूळ मालकाला दिली. सफाई कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रविवार (दि. ८ जून) रोजी आदर पूनावाला क्लीन सिटीचे कर्मचारी केसनंद (ता. हवेली) भागात नियमित काम करत असताना त्यांना त्याच गावातील शबाना महमंद शेख या महिलेने भेट घेऊन त्यांची हिऱ्याची अंगठी गहाळ झाली असल्याचे सांगितले. गहाळ झालेली अंगठी कचऱ्यात गेलेली आहे अशी महिलेला शंका होती. जेंव्हा आदर पूनावालाचे कर्मचारी विवेक सावंत व मनोज जाधव यांना सांगीतले तेव्हा त्यांनी त्यांची शंका दूर करण्यासाठी पूर्ण भरलेली गाडी रिकामी करून एक एक कचरा वेगवेगळा करून शोधण्यास सुरवात केली. बराचवेळ कचऱ्यात शोध घेतल्यानंतर ती हिऱ्याची सापडली. अंगठी मिळाल्याने शेख कुटुंब आनंदी झाले. त्यांनी आदर पूनावाला क्लीन सिटीचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी आदर पूनावाला क्लीन सिटीचे सीसीओ मल्हार करवंदे, प्रकल्प मॅनेजर फारूक बांगी, एएसआरचे फील्ड ऑफीसर अँर्डो फ्रँक व सुपरवायझर अविनाश चव्हाण उपस्थित होते.