Video : केसनंद रस्त्यावर वाहते दुर्गंधीयुक्त पाणी
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, रस्ता रोकोचा इशारा

वाघोली : वाघोली-केसनंद मुख्य रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त ड्रेनेज व पावसाचे पाणी साचून वाहत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळी व ड्रेनेज नाल्यांचा अभाव आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले. पक्षातर्फे पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देऊन तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात कराव्या अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाघोली परिसरात पावसाळी व ड्रेनेज लाईनच नसल्यामुळे दरवर्षी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. रस्त्यावर वाहणाऱ्या मैला पाण्यामुळे पायी चालणे अवघड झाले असून, वाहनचालकांनाही वाहतुकीच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना न केल्यास पुढील टप्प्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे, पूर्व खराडी-वाघोली प्रभाग चारचे अध्यक्ष विजय गोरे, पूर्व खराडी-वाघोली प्रभाग चारचे सचिव विशाल राठोड, वाघोली अध्यक्ष अजिंक्य शेडगे यांचेसह नागरिक सहभागी झाले होते.
निष्क्रीय अधिकाऱ्यांवर टिका, बदल्यांची मागणी
उप अभियंता विनायक शिंदे आणि कनिष्ठ अभियंते हे गेली अनेक वर्षांपासून मलनिस्सारण विभागात कार्यरत आहेत. हे अधिकारी निष्क्रीय असल्याचा आरोप जमधडे यांनी केला. ‘ते महापालिकेचे जावई आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत त्यांच्या बदल्याची मागणी त्यांनी केली. तसेच वाघोलीसाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
» निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करा
» एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा
» मुख्य केसनंद रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर ड्रेनेज व पावसाळी नाल्या करा
» केसनंद रस्त्याचे काँक्रिटीकरण करा