गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
बाथरुम स्वच्छ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून घडली घटना; येरवडा बाल सुधारगृहातील प्रकार

वडगावशेरी : बाल सुधारगृहातील बाथरूम साफ केला नाही म्हणून पाच विधी संघर्षग्रस्त बालकांनी संगणमत करून त्यांच्याच बॅरक मधील १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकास शिवीगाळ करून मारहाण करून केली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार येरवड्यातील बाल सुधारगृहात (निरीक्षण) घडला आहे. याप्रकरणी सुधारगृहातील काळजीवाहक संतोष किसन कुंभार (वय ४९) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात पाच विधी संघर्षित बालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथे बाल सुधार गृहात १८ वर्षाच्या आतील विधी संघर्षित बालकांना ठेवले जाते. बराक क्रमांक दोन मध्ये सर्वांना ठेवण्यात आले होते. दिनांक १० जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पाच जणांनी मिळून एका १७ वर्षीय बालकास बाथरूम साफ कर असे सांगितले. त्याने नकार देताच पाच जणांनी संगनमत करून त्यास शिवीगाळ करून मारहाण केली. टॉवेल फाडून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. काळजीवाहकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जखमी बालकाची प्रकृती स्थिर आहे. निरीक्षण गृहास सहायक पोलिस निरीक्षक प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टकले करत आहेत.