तीन महिन्यांपासून फरार असलेला ‘मकोका’तील आरोपी जेरबंद
शिक्रापूर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी; दोन दिवसांपासून रचला होता सापळा
पुणे : पोलिसांना तीन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला सराईत गुन्हेगार वैभव संभाजी आदक याच्या साथीदाराला शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळविले आहे.
आनंद पंडीत कसबे (रा .करंदी ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला सराईत गुन्हेगार वैभव संभाजी आदक याचा साथीदार तीन महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शोध पथक फरार आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा बीड जिल्ह्यातील पाटोदा गावामध्ये असल्याची खात्रीशीर माहिती पोकॉ निखील रावडे व किशोर शिवणकर यांना बातामिदारामार्फात मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व त्याचे पथक बीड जिल्यातील पाटोदा गावी पोहचले. गुन्हे शोध पथकाने दोन दिवस सापळा रचला. पोलीस असल्याचे लक्षात येताच आरोपीने पोलिसांना चकवा देत येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शोध पथकातील पोकॉ निखील रावडे व पोकॉ जयराज देवकर यांनी दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत ऊसाचे शेतातून व काटेरी झुडपांमधून आरोपीचा पाठलाग करून त्यास अखेर जेरबंद करण्यात यश मिळविले. पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी, राहुल धस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोहवा जितेंद्र पानसरे, पोना अमोल दांडगे, पोना श्रीमंत होनमाने, सागर कोंढाळकर, विकास पाटील, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, पोकॉ जयराज देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर व लखन शिरसकर यांनी केली आहे.