वाघोली-केसनंद रस्त्यावरच महिलांनी केला रक्षाबंधनाचा सण साजरा
जे.जे. नगरच्या लेन सहामधील महिलांनी केले अनोखे आंदोलन

वाघोली : वाघोली-केसनंद रस्त्याचे काम संथगतीने चालू आहे. जे.जे. नगरच्या लेन सहा मध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे एक महिन्यापासून येथील रहिवाशांना पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक महिन्यापासून रस्त्या अभावी पाणी मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी चक्क रस्त्यावरच बहिणींनी भावांना राखी बांधून अनोखे आंदोलन केले आहे. हे आंदोलन मनसे विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅॅड. गणेश म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
वाघोली-केसनंद रस्ता काँक्रीटीकरणाचे काम संथगतीने चालू असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज होणाऱ्या कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच जे.जे. नगरच्या लेन सहा मध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना मोठा सामना करावा लागत आहे. लेन सहा मधील रहिवाशांसाठी येण्या-जाण्यासाठी संबधीत ठेकेदाराकडून रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नसल्यामुळे एक महिन्यापासून पाण्याचे टँकर सुद्धा आता येत येऊ शकत नसल्यामुळे रहिवाशांना पाण्या अभावी हाल सोसावे लागत आहेत. बहिण-भावांच्या पवित्र व अतूट नाते असणाऱ्या रक्षाबंधन सणाला देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने लेन सहा मधील संतप्त झालेल्या भगिनींनी प्रशासनाला जागे करण्यासाठी चक्क रस्त्यावर येऊन भावांना राखी बांधून एक अनोखे आंदोलन केले आहे.
महिलांनी वाचला समस्यांचा पाढा :
- कचरा उचलण्यासाठी गाड्या येत नसल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढेल असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- लेन सहा मध्ये केसनंद वरून विद्युत पुरवठा करण्यात आल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले.
- केसनंद फाटा येथील डीपीवरून पुरवठा करण्यात यावा किंवा लेन सहासाठी स्वतंत्र डीपी देण्यात यावी.
- दोन ते दिन दिवसाआड पाणी येत असून केवळ पंधरा ते वीस मिनिट पाणी सोडले जात आहे. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठ्या अभावी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.
दिवसा काम करता येत नसल्यामुळे आज रात्री लेन सहा मधील रहिवाशांना जाण्यासाठी रस्ता करून देणार आहे.
– किरण उंद्रे (ठेकेदार)
जर रुग्णाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावयाचे असेल तर रुग्णवाहिका किंवा आग लागल्यास अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकली नाही तर अशावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– अॅॅड. गणेश म्हस्के (विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष, मनसे)