शिवनेरी हापूस ब्रँड अंतर्गत भौगोलिक चिन्हांकन करिता नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत २६ लाख ४८ हजार रुपये मंजूर
- आमदार अतुल बेनके यांची माहिती

पुणे : जुन्नर/आंबेगाव तालुक्यातील हापूस आंबा पिकाचे शिवनेरी हापूस ब्रॅन्ड अंतर्गत भौगोलीक चिन्हांकन बाबींकरीता २६ लाख ४८ हजार रुपये जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत मंजूर झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की ०५ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी जुन्नर तालुका दौऱ्याच्यावेळी व ५ मे २०२१ रोजी जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर कामाला निधी उपलब्ध करून देण्याची सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केली होती. त्याअनुषंगाने जुन्नर/ आंबेगाव परीसरातील हापूस आंबा उत्पादक शेतक-यांच्या मागणीचा विचार करून दोन्ही तालुक्यातील हापूस आंबा पिकाचे शिवनेरी ब्रॅंड अंतर्गत भौगोलीक चिन्हांकन (GEOGRAPHICAL INDICATION) बाबत काम सुरू करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे या कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आलेली होती.
सद्यस्थितीत आंबा उत्पादक शेतक-यांची माहिती तयार करणे व त्यांची कंपनी स्थापन करण्याआधी कार्यवाही प्रगतीत आहे. देवगड व जुन्नर तालुक्यातील हापूस आंबाचे तुलनात्मक अभ्यासाकरीता कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव व कृषि विभागाचे अधिकारी यांनी रत्नागीरी, देवगड, दापोली परीसरातील उत्पादक शेतकऱ्यांना भेट देऊन आंबा झाडांच्या पानांचे व फळांचे नमुणे तपासणीस सादर केलेले आहेत. जुन्नर/आंबेगाव परीसरातील हापूस आंबा पिकाचे ऐतिहासीक संदर्भ शोधणे, हापूस आंबा उत्पादक/विक्रे/ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेणे, त्यास प्रसिद्धी देणे या भौगोलीक चिन्हांकनाच्या दृष्टीने अनुषंगीक कार्यवाही प्रस्ताव जिल्हा नियोजनला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी सादर केला होता.
जुन्नर/आंबेगाव तालुक्यातील हापूस आंबा पिकाचे ‘शिवनेरी‘ हापूस ब्रॅन्ड अंतर्गत भौगोलीक चिन्हांकन करणेकरिता एकूण २६.४८ लाख रुपये निधीची आवश्यकता होती. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्याकडे अनुदानाची तरतूद नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून डीपीडीसी अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतुन २६ लाख ४८ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.