वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या औपचारिक 'ट्रायल रन'ला हिरवा झेंडा

वाघोली : सद्यस्थितीत असणाऱ्या वनाज ते रामवाडी मेट्रोचे मार्ग वाढविले जाणार असून वनाज पासून चांदणी चौकापर्यंत तर रामवाडी पासून वाघोली पर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे मेट्रोची पहिली औपचारिक ‘ट्रायल रन’ वनाज डेपो ते आनंदनगर स्टेशन पर्यंत पार पडली. अजित पवार यांच्या हस्ते यावेळी मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मेट्रो बाबत असणाऱ्या भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना पवार म्हणाले कि, शहरातील वाढती गर्दी, प्रदूषण, कोंडीवर मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. पुणे हे देशातील सर्वात चांगलं सुरक्षित व सर्व सोयींनी युक्त असे शहर बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मेट्रो हा त्याचाच भाग असून पुण्याच्या आधुनिक इतिहासात मेट्रोची नोंद होईल. पुणे मेट्रोच्या कामासाठी निधी अजिबात कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. निगडी ते स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली पर्यंत मेट्रो नेण्याचे नियोजन तसेच हडपसरहून वाघोलीपर्यंत मेट्रो जोडता येईल याचे देखील नियोजन असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.
रामवाडीची मेट्रो वाघोलीपर्यंत आणण्याची मागणी यापूर्वी अनेकदा लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याबाबतचे नियोजन करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. भविष्यात अजित पवार यांनी वाघोलीपर्यंत मेट्रो नेण्याचे नियोजन जाहीर केले असल्याने वाघोलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.