पुणे ते शिरूर दुमजली पुलासाठी ७ हजार २०० कोटी

राष्ट्रवादी व भाजपमध्ये श्रेयवादावरून रंगला कलगीतुरा

वाघोली  :  पुणे ते शिरूर पर्यंत ६७ किलोमीटर लांबीचा रस्त्यावरील दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ७ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. निधी मंजुरीनंतर श्रेयवादासाठी मात्र सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पहावयास मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रुत असणारी पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून यावर तोडगा काढण्यासाठी वाघोली ते शिक्रापूर पर्यंत रस्ता रुंदीकरण केले जात आहे. वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेता सद्यस्थितीत रुंदीकरण देखील अपुरे पडणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे अॅड. आमदार अशोक पवार यांनी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी पुणे-शिरूर रस्त्यावर दुमजली एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारले जाणार असल्याचे सांगितले होते. नितीन गडकरी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पुणे-शिरूरचा दुमजली एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यासाठी यंत्रणा राबविली त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या प्रकल्पासाठी ७ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळे पुणे-शिरूर रस्त्याचे काम मार्गी लागत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. भाजपाच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असल्याच्या प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांकडून उमटत आहेत. सोशल मीडियावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button