Video : कोलवडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वाघोली : कोलवडी (ता. हवेली) येथील भालसिंग वस्तीवर घरासमोर पटांगणात म्हैस, वासरू व इतर जनावरे बांधली असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना मंगळवार (दि. ८) रोजी मध्यरात्री घडली. बिबट्याने ठार केलेल्या वासराला ऊसाच्या शेतात घेऊन गेला. बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मांजरी कोलवडी भागामध्ये बिबट्याच्या पाउलखुणा वारंवार दिसून येत असताना बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
काही दिवसांपासून कोलवडी, मांजरी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामूळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंधरा दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने ठार केले होते. तसेच आठ दिवसांपूर्वी दत्तात्रय आव्हाळे यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ बिबट्या आढळला होता. परंतू गोठा बंदिस्त असल्याने त्याला शिकार करता आली नाही. बिबट्याचा परिसरात वावर वाढल्याने वाढला असून शेतात पीकाला पाणी देण्यासाठी जाणेही धोकादायक झाले असल्याचे शेतकरी दत्तात्रय जोरे, संजय गायकवाड, आणि आनंदा मुरकुटे यांनी सांगितले. वनविभागाला वारंवार माहिती देण्यात आली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याने मानवावर हल्ला केल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सदर ठिकाणी वन विभागाचे पथक पाठवून पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. शेतात कामानिमित्त जाताना एकट्याने न जात अजुन एक-दोघांनी बाहेर पडावे. नागरिकांची सतर्क राहावे. पिंजरा लावायचा असेल तर त्या प्रक्रियेला वेळ जातो. – सुरेश वरख (परिक्षेत्र वन अधिकारी, पुणे)