धानोरीत होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न
खेळ खेळत, गाण्यांवर थिरकत महिलांनी लुटला आनंद; ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आले होते आयोजन
पुणे : धानोरीतील परांडे नगर येथे ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती लावून खेळ खेळत गाण्यांवर थिरकत आनंद लुटला.
‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने धानोरी येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) करण्यात आले होते. यामध्ये खेळ पैठणीचा, आदर स्त्री शक्तीचा आदी विविध कार्यक्रमांमध्ये महिलांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटत विविध आकर्षक बक्षिसे जिंकली. ज्यामध्ये पैठणी सोबतच फ्रीज, टीव्ही, मायक्रोवेव्ह, गोल्ड प्लेटेड दागिने, पारंपरिक नथ, चांदीचे छल्ले आणि इतर अनेक आकर्षक वस्तूंचा समावेश होता. प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यांची उपस्थिती व ‘संगीत मैफील’ संजू राठोड यांच्या गाण्यांवर नागरिकांनी ताल धरला.
‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम खूपच आनंददायी ठरला. या कार्यक्रमामुळे आम्हाला विविध खेळ खेळण्याची संधी मिळाली. त्याबरोबर बक्षीसही मिळाले असल्याचे कार्यक्रमात सहभागी महिलांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सादरीकरण व सूत्रसंचालन अभिनेते ओम यादव यांनी केले.
महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची क्षमता ओळखून त्यांना एकत्र आणणे, त्या क्षमतेला वाव देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक माता, भगिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून समाधान मिळाले व खूप आनंद झाला.
– सुरेंद्र पठारे (अध्यक्ष, सुरेंद्र पठारे फाऊंडेशन)