यापुढे डंपर अपघातात जीवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांचा अवजड वाहन चालकांना इशारा

वाघोलीयापुढे डंपर अपघातात जीवितहानी झाल्यास चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड इशारा लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिला. पुणे-नगर महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी डंपर चालक, मालक यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये रेजितवाड यांनी चालकांना सक्त ताकीद दिली.

पुणे-नगर महामार्गावर डंपरच्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. नगर महामार्ग जीवघेणा बनल्याने नागरिकांमधून चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक पोलीस व परिवहन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला जात आहे. मागील दहा-बारा दिवसांमध्ये अपघातात दोन बळी गेली आहेत. त्यामुळे अजूनच नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट आहे. अपघाताची मालिका सुरूच असल्याने लोणीकंद पोलिसांनी अपघाताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) डंपर चालक, मालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक रेजितवाड यांनी चालक. मालक यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच डंपरच्या अपघातात जीवितहानी चालक, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला.

बंदी घातलेल्या वेळेत डंपर रस्त्यावर आणू नका. होणाऱ्या अपघातामुळे एक दिवस उद्रेक होईल. त्यामुळे व्यवसाय बंद सुद्धा करण्याची वेळ येईल. नियमांचे उल्लंघन करू नका. वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या वेळातच वाहने चालवा. नियमांचे उलंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसल्याची लोणीकंद वाहतूक विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी सक्त ताकीद दिली.  

यावेळी लोणीकंद वाहतूक शाखेचे सहा. पोनि गजानन जाधव, पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाचे कार्याध्यक्ष रामभाऊ दाभाडे, युवराज दळवी यांचेसह डंपर चालक, मालक उपस्थित होते.

कोणताही डंपर मालक बेदरकारपणे वाहन चालवण्यास सांगत नाही. चालक आगाऊपणा करतात. नियमांचे उल्लंघन व बंदी असलेल्या वेळेचे बंधन न पाळणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई झाली पाहिजे. वाहतूक विभागाला बॅरीकेट्स व दहा ट्रॉफिक वार्डन देण्यात आले आहेत. प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देणार आहोत.

– रामभाऊ दाभाडे  (कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघ)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button