वडगावशेरीत तुमच्या मनातीलच उमेदवार देणार – अजित पवार
आमदार टिंगरेना बदनाम करण्याचा प्रयत्न

वडगावशेरी : महायुतीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदार संघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडगावशेरीत मी तुमच्या मनातीलच उमेदवार देणार असे सांगितले. मात्र नाव जाहीर केले नाही. आमदार सुनील टिंगरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगतले.
आमदार सुनिल टिंगरे यांच्या संकल्पनेतून खराडी येथे साकारण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, मीनल सरवदे, उषा कळमकर, शीतल सावंत, मनोज पाचपुते, स्वप्नील पठारे यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पठारे यांच्या पक्ष प्रवेशावर अप्रत्यक्षरीत्या बोलताना अजित पवार म्हणाले, काही लोक इकडे जातात तिकडे जातात. लोकशाहीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे, त्यामुळे त्यावर टीका टिपण्णी करणार नाही. परतू कारण नसताना अलीकडच्या काळात एक चांगला लोकप्रतिनिधी, ज्याने नगरसेवक म्हणून पण काम केले. सर्व समाज घटकांमध्ये मिळून मिसळून राहाणारा. सर्व समाजाला न्याय देणारा आमदार सुनिल टिंगरे असताना काहींनी त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सुनिल टिंगरे सारखा एक धडाकेबाज लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला असल्याचे सांगत त्यांनी टिंगरे यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.