वाघोलीत डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
अवजड वाहतूक बंदीला केराची टोपली; नागरिक रस्ता रोकोच्या पवित्र्यात
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते लोणीकंद पर्यंत सकाळी व सायंकाळी निच्छित वेळेत अवजड वाहतुकीला बंदी असताना नियमांचे उल्लंघन करून भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती जखमी झाला आहे. ही घटना नगर महामार्गावर चितळे स्वीट होम समोर सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. बंदी असताना सुद्धा बिनधास्त नियमांचे उल्लंघन करून अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. १२ दिवसातील हा दुसरा बळी आहे.
सिरीचंदना विश्वनाथ हेवटम (वय ३२, रा. न्याती ईलान, वाघोली, मूळ रा. आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती विश्वनाथ हे जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ पती-पत्नी व त्यांचे मित्र असे दोन दाम्पत्य सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बायफ रोड वर गेले होते. तेथून परत येत असताना अपघात होण्याच्या आधी दोन्ही दाम्पत्याने घटना स्थळाच्या अलीकडे नाश्ता केला. तेथून निघताच पुढे काही अंतरावर विश्वनाथ यांच्या दुचाकीला भरघाव डंपरने धडक दिली.
यामध्ये सिरीचंदना या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या अपघाताच्या धक्याने त्यांचे पती विश्वनाथ यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तर त्यांचे मित्रासह महामार्गावरून जाणाऱ्यांना धक्का बसला.
पोलीस आल्यानंतर अर्ध्या तासाने मृतदेह ससून रुग्णालयात हलविला. सकाळीच झालेल्या या अपघाताने बघणारे सर्वजण हेलावून गेले. अपघातानंतर डंपर चालक डंपरसह पळून गेला. २४ सप्टेबर रोजी पुणे-नगर महामार्गावर रिलायन्स समोर डंपरच्या धडकेत चैतन्य शिंदे या युवकाचा बळी गेला होता. तर लोहगाव रोडवर आरएमसी डंपरने स्कूल बसला धडक दिली होती.
अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला येणार जाग?
पुणे-नगर महामार्गावर लोणीकंद वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूक कोंडीच्या दृष्टीने अवजड वाहनांना सकाळी ७ ते ११ सायंकाळी ५ ते ९ या वेळेत वाहतुकीला बंदी आहे. ४ ऑक्टोबर रोजी पोलीस उपायुक्तांनी बंदीचे आदेश काढले असले तरी यापूर्वी अवजड वाहतूक बंदीचे आदेश काढण्यात आले होते. नागरिकांनी अनेकवेळा सोशल मीडिया तसेच प्रत्यक्षपणे पोलिसांना बंदीच्या काळामध्ये डंपरची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु अनेक अवजड वाहने तसेच डंपर चालकांकडून बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने समोर येत आहे. अवजड वाहतुकीच्या होणाऱ्या त्रासामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी वाघोलीतील नागरिक रस्ता रोको आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांसह परिवहन विभागाचे वाहनधारकांशी लागेबांधे असल्याचा सूर देखील नागरिकांमधून उमटताना दिसून येत आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन करणारे डंपर मोकळ्या जागेत लावून टाकले असून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे. सोमवारी (दि. ऑक्टोबर) लोणीकंद पोलीस ठाण्यात डंपर चालक, क्रशर संघटनेचे बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीमध्ये कडक सूचना देण्यात येणार आहेत. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक विभाग व परिवहन विभागाची संयुक्त कारवाई करण्यासाठी वारंवार परिवहन विभागाला कळवण्यात येते. परंतु परिवहन विभागाचे अधिकारी दर आठ दिवसाला बदलत असल्याने कारवाईमध्ये सातत्य राहत नाही. परिवहन अधिकाऱ्यांनी परिणामकारक आणि गांभीर्यरित्या कारवाई केली तर पोलीस प्रशासनाला हातभार लागेल.
– गजानन जाधव (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)