वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करा
अ.भा.मा. सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित आव्हाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे आव्हाळवाडी फाटा व केअर हॉस्पिटल जवळ बेशिस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच आव्हाळवाडी फाट्यावर मजूर अड्डा असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित आव्हाळे यांचेसह योगेश सातव यांनी एका निवेदनाद्वारे लोणीकंद पोलीस निरीक्षक व वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त यांचेकडे केली आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशनचा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात समावेश करण्यात आला. त्याचबरोबर वाघोली (ता. हवेली) गावाचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला. लोणीकंद पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालयाशी जोडले गेल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली. केसनंद फाटा येथे स्वतंत्र वाहतूक शाखेचे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी यामध्ये एक सहा. पोलीस निरीक्षक व १४ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी पासून सुटका मिळणार अशी नागरिकांना आशा होती. परंतु भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणारी वाहने, पुणे-नगर महामार्गावर ठिकठिकाणी बेशिस्त लावण्यात येणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. छोट्या-मोठ्या अपघातांसह वादविवादांचे प्रमाण वाढले आहे. प्रमाण येणाऱ्या वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत आहेत. परंतु पोलीस ठोस कारवाई न करता थातूरमातूर कारवाई करत असल्यामुळे वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. नगर महामार्गावरील केसनंद फाटा ते वाघेश्वर मंदिर चौक दोन्ही बाजूने बेशिस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे गरिकांना कोंडीचा सामना नाकरावा लागत आहे. त्यातच आव्हाळवाडी फाटा येथे मजुरांचा भरतो त्यामुळे या ठिकाणी मजूर पूर्ण रस्ता अडवून ठेवतात. तसेच बाजारात भाजीपाला घेऊन येणारे वाहने सुद्धा रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामधून कधीकधी वादाच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याचे अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे प्रदेश सचिव आव्हाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वाघोली-लोहगाव रस्त्यावर आव्हाळवाडी फाट्याजवळ केअर हॉस्पिटल आहे. या ठिकाणी वाहनधारक बेशिस्त वाहने लावतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबधित विभागाकडे वारंवार मागणी करून देखील ठोस कारवाई केले जात नाही.
– योगेश सातव (ग्रामस्थ)
बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. दररोज साधारणतः ५० वाहनांवर कारवाई केली जात आहे. आव्हाळवाडी फाट्यावर थांबणाऱ्या मजुरांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
– जयंत पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)