पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने
रस्त्यावर पसरविण्यात आलेल्या खडीमुळे अपघाताची शृंखला; दररोज घडताहेत अपघात
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली ते शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने चालू आहे. अनेक दिवसांपासून काही ठिकाणी खडी पसरविण्यात आली आहे. रस्त्यावरील खडीमुळे दररोज अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वाहनधारकांसह नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सनी अन्सारी यांनी केली आहे.
पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाचे अतिशय संथगतीने काम सुरु आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टीने रुंदीकरणाचे काम मागील एक ते दीड वर्षांपासून सुरु आहे. काम अतिशय संथपणे चालू असल्यामुळे कोंडीचा प्रश्न सुटण्याऐवजी दररोज नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रुंदीकरण करण्यात येत आहे. करण्यात येत असलेल्या अर्धवट कामामुळे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी स्थिती महामार्गाची निर्माण झाली आहे. महामार्गावर पसरविण्यात आलेल्या खडीमुळे दररोज अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. गुरुवार (दि. १२ ऑगस्ट) रोजी अवघ्या १५ ते २० मिनिटातच चार दुचाकीस्वारांचा खडीवरून घसरून अपघात झाला आहे. तिघांना किरकोळ मार लागल असू एकाला जबर मार लागला. नगर महामार्गावर भरधाव वेगाने वाहणारी वाहने असतात. परंतु सुदैवाने वाहने नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले
अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी केवळ खडी पसरविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना धोका पत्करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खडीमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. संबधित ठेकेदाराने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे काही दिवसांपूर्वीच वाघेश्वर चौकात टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात झाला होता. अनेक दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली केवळ खडी पसरवून ठेवण्यात आल्यामुळे दररोज होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे.
गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह
वाघोली ते शिक्रापूर चालू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामाच्या गुणवत्तेबाबत माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच कविता दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दळवी, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक, शिवदास पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून संबधित विभागाकडे तक्रारी देखील केल्या होत्या.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु होऊन एक वर्ष उलटले. परंतु संथगतीने चालू असलेल्या कामामुळे नागरिकांना पुणे-नगर महामार्ग जीवघेणा ठरत आहे.
– सनी अन्सारी (सामाजिक कार्यकर्ते)
खडी टाकण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये डांबर प्लांट बंद असतो. त्यामुळे डांबरचे काम लगेच होणार नाही. परंतु एक वेगळ्या प्रकारची खडी टाकून घेतो म्हणजे ती दबून जाईल व वाहने घसरणार नाहीत.
– नरेंद्र गांगुले (प्रोजेक्ट मॅनेजर)











