बनावट सोने गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी; वाघोलीत खांदवेनगर परीसरातून घेतले ताब्यात

वाघोली : शहरातील सराफ दुकानदारांची बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने वाघोलीतील खांदवेनगर परिसरातून जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहित संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८, रा.) ओम सुंदर खरात, (वय २३, दोघेही रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय बातमीदारामार्फात पुणे शहरामध्ये ज्वेलर्स दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे इसम हे खांदवेनगर, वाघोली परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदननगर, कळेपडळ, पर्वती, आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३ लाख रुपये रोख रक्कम, १ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन, ४ लाख रुपये किमतीचे हॉल मार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने असा एकुण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितीन घाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.