महायुतीकडून ज्ञानेश्वर कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल
विरोधकांना घाम फोडणारी गर्दी; गर्दीच्या उच्चांकाने गाजली सभा; आमदार अशोक पवारांसमोर माऊली कटके यांचे तगडे आवाहन
वाघोली : शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीकरिता महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.२९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्ज भरताना काढलेल्या रॅलीमध्ये विरोधकांना घाम फोडणारी झालेली गर्दी आणि पाचकंदील चौकामध्ये झालेली सभा गर्दीच्या उच्चांकाने चांगलीच गाजली. शिरूर-हवेली विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने झुकणारी असल्याचे बोलले जात असताना महायुतीकडून करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यासमोर माऊली कटके यांचे तगडे आवाहन उभे ठाकले आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी जाहीर होताच उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत अगोदरच पवार यांनी दाखल केला आहे. उमेदवारीसाठी भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरु असताना महायुतीकडून शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर महायुतीतील अनेकांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीचे हत्यार उपसले. यामध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपचे शिरूर विधानसभा निवडणूक समन्वयक प्रदीप कंद यांनी देखील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन उमेदवारांच्या बंडखोरीमुळे महायुती पुढील टेन्शन वाढले असतानाचा महायुतीचे अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले माऊली कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
माऊली कटके यांनी कार्यकर्त्यांसह सकाळी वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात वाघेश्वराचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूरच्या दिशेने आगेकूच केली. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे जात असताना महामार्गावरील सर्वच मोठ्या गावांमध्ये कटके यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिरूर येथील माजी आमदार बाबुराव पाचर्णे स्मृतीस्थळाला वंदन करीत मार्केट कमिटी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली.
शिरूर शहरातील विविध प्रार्थनास्थळांना भेटी देऊन पुढे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पाचकंदील चौक येथे झालेल्या सभेत कटके यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. महायुतीने एकत्रित येऊन माऊली कटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे विरोधकांना घाम फोडला आहे. आगामी निवडणूक हलकी नाही तर घासून होणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी मिळाले आहेत. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सध्यातरी कटके यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.