पोस्टमन नामदेव गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे अपघातात मृत पावलेल्या महिलेच्या वारसांना मिळाले दहा लाख रुपये
भारतीय डाक विभाग व टाटा एआयजीमुळे ढोबळे कुटुंबाला मिळाला आर्थिक हातभार

वाघोली : वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर जानेवारी महिन्यात सुप्रिया सजित ढोबळे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे पती सजित ढोबळे यांनी त्यांचा व पत्नीचा भारतीय डाक विभागाचा अपघाती विमा काढला होता. वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केल्याने मयत ढोबळे यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे.
भारतीय डाक विभागाची नवीनच ३९९ रुपयात दहा लाखांचा अपघात विमा योजना सुरु करण्यात आली होती. दरम्यान पोस्टमन नामदेव गवळी यांनी वरिष्ठ अधिकारी योगेश वीर यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा याझकी कंपनीमध्ये मेळावा घेतला होता. मयत सुप्रिया ढोबळे यांचे पती टाटा याझकी कंपनीतच काम करत असल्याने त्यांनी या मेळाव्यात सहभाग घेवून त्यांचा व पत्नीचा अपघाती विमा उतरवून घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच पुणे-नगर रोडवर वाघोली येथे लेक्सीकॉन स्कुलजवळ सुप्रिया ढोबळे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
पोस्टाचा अपघाती विमा काढल्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेमुळे सुमारे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली आहे. पोस्टाचा व टाटा एआयजीचा विमा काढल्यामुळे ढोबळे कुटुंबाला आर्थिक हातभार मिळाला आहे. मयत सुप्रिया ढोबळे यांच्या पश्चात पती, सासू, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
सुप्रिया यांचे अपघाती निधन झाल्याने ढोबळे कुटुंब खचून गेले होते. परंतु पोस्टमन गवळी यांनी ढोबळे कुटुंबाला मानसिक धीर देत विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. शवविच्छेदन अहवाल, पंचनामा अशा अनेक अडचणी सोडवत मयत सुप्रिया ढोबळे यांच्या वारसांना १० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवून देण्यास अखेर गवळी यांना यश मिळाले. रक्कमेचा धनादेश सुपूर्द करताना सजित ढोबळे यांनी पोस्टमन गवळी यांचे मनापासून आभार मानले.
पोस्टमन गवळी हे पोस्टाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. पत्र वाटताना येणारे अनुभव ते ‘किस्से पोस्टमन’चे या सदरात लिहितात. भारतीय डाक विभागाच्या योजना अत्यंत लाभदायक असून त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे गवळी यांनी आवाहन केले आहे.
माझ्या पत्नीचे अपघाती निधन झाल्याने मी खचून गेलो होतो. माझी एकट्याची विमा कंपनीशी लढण्याची ताकद नव्हती. परंतु पोस्टमन गवळी यांनी मानसिक आधार दिला. स्वतः क्लेम कंपनीशी वेळोवेळी भांडून त्यांनी अनेक अडचणी सोडविल्या. गवळी यांच्या पाठपुराव्यामुळे दहा लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली आहे. रक्कमेचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे. पैशांनी गेलेली व्यक्ती परत येत नाही, पण मुलांच्या भवितव्यासाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. – सजित ढोबळे