वडगावशेरीत तीन आजी-माजी आमदारांमध्ये होणार लढत?
दोन उपमुख्यमंत्री महायुतीची कोणाला उमेदवारी देणार
वडगावशेरी : वडगावशेरी मतदार संघात उमेदवारी मिळवण्यावरुन प्रमुख पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संमभ्रावस्थेत आहेत. महाविकास आघाडीकडून माजी आमदार बापुसाहेब पठारे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र महायुती मध्ये आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात उमेदवारी मिळवण्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. या मतदार संघात तीनही आजी-माजी आमदार निवडणूक लढण्यावरुन ठाम असून प्रत्येकाने जोरदार तयारी सुर ठेवल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) विद्यमान आमद़ार सुनील टिंगरे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगेस गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, लोहगावचे माजी उपसरपंच सुनील खांदवे मास्तर या चौघांनीही निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीचे जगदीश मुळीक आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यामध्ये तर शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि सुनील खांदवे मास्तर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून बापूसाहेब पठारे यांचे नाव निश्चित झाले असून त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली आहे.
महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याचे संकेत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचे टिंगरे सांगत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यालाच शब्द दिला असून आपली उमेदवारी पक्की असल्याचे मुळीक सांगत आहेत. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
मुळीक यांना उमेदवारी मिळाली तरी अन् नाही मिळाली तरी निवडणूक लढवायचीच आहे असा निर्धार करून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचे काही जवळचे कार्यकर्ते तर छाती ठोकपणे सांगत आहेत की आम्हाला पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच ही निवडणूक लढवायची असा संदेश दिला असल्याचे सांगत आहेत. मतदार संघातील मोठ्या सोसायटीमध्ये जगदीश मुळीक यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवातही केली आहे. सुनील टिंगरे यांनीही समाज माध्यमाद्वारे प्रचारावर जोर दिलेला आहे. कार्यकर्ते गाठीभेटी घेत आहेत. सर्वच प्रमुख निवडणुक लढणार असल्याचे सांगत असले तरी लढत तीनही आजी-माजी आमदारांमध्ये होणार आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी टिंगरे आणि मुळीक यांच्यात चुरस लागली आहे. कार्यकर्ते मात्र संभ्रमा अवस्थेत आहेत.
याचबरोबर वंचित, मनसे, बसपा, परिवर्तन महाशक्ती, एमआयएम या पक्षाचे देखील उमेदवार वडगांवशेरी मतदार संघात असणार आहेत. काही झाले तरी आम्ही निवडणूक लढवणारच असे शब्द टिंगरे आणि मुळीक यांचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. त्यामुळे तीनही आजी-माजी आमदार एकमेकांसमोर पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१४ सारखी पुन्हा या तिघात लढत पहायला मिळणार आहे.