वाघोली येथे मोहल्ला मिटिंग घेण्याची मागणी
पुणे मनपा आयुक्तांना श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश जाचक यांचे लेखी निवेदन

वाघोली : वाघोली गाव पुणे महापालिकेत जावून तीन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. परंतु अद्यापपर्यंत एकही मोहल्ला मिटिंग झाली नाही. त्यामुळे वाघोली येथे मोहल्ला कमिटीची मिटिंग घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश जाचक यांनी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली ग्रामपंचायत पुणे मनपामध्ये समावेश होऊन तीन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. वाघोलीची लोकसंख्या तीन लाखांच्यावर पोहचली आहे. पथ, ड्रेनेज, कचरा, लाईट, पाणी आदी मुलभूत समस्या मोठ्याप्रमाणात भेडसावत आहेत. ग्रामपंचायत असताना पूर्वी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थ समस्या मांडत होते. त्यानंतर लवकरच ग्रामपंचायतीकडून समस्या सोडविल्या जात होत्या. वाघोली गावचा मनपामध्ये समावेश झाल्यामुळे विविध प्रश्न मार्गी लागतील अशी आशा नागरिकांना होती मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.
सर्वसामान्य नागरिकांना समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ नसल्याने प्रत्येकवेळी पुणे मुख्य कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयाला जाण्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. त्यामुळे वाघोली येथे दर महिन्याला त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मोहल्ला कमिटीची मिटिंग घेतल्यास ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे शक्य होईल आणि नागरिकांची आर्थिक बचत होईल व वेळही वाचेल. एक दिवस आधी दवंडी दिल्यास ग्रामस्थ सुद्धा मिटींगला उपस्थित राहतील आणि एकाच ठिकाणी विविध समस्या मार्गी लावणे शक्य होईल. यावेळी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश जाचक, शिवदास पवार यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
विविध पक्षांचे पदाधिकारी आणि अधिकारी केवळ समस्यांची पाहणी करून फोटो काढण्यात मग्न आहेत. त्यामधून काहीही निष्पन्न होत नसल्याने मोहल्ला मिटिंग घेतल्यास प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची ग्रामस्थांबरोबर चर्चा होईल आणि समस्या सोडवणे शक्य होईल. – कल्पेश जाचक (अध्यक्ष, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान, वाघोली)