शरद पवारांचा भाजपला दे धक्का
वडगावशेरीत भाजपाचे माजी आमदार, नगसेवक हाती घेणार तुतारी?
वडगावशेरी (उदय पोवार) : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तुतारी हाती घेतल्यास विजय नक्की अशी अपेक्षा असल्याने वडगावशेरी मतदार संघातील सद्या भाजपकडे असलेले एक माजी आमदार, एक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र दोघेही विधानसभा निवडणूक लढणार असल्याने एकाच मॅनात दोन तलवारी कशा रहाणार अशी चर्चा देखील कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
महायुती मध्ये वडगावशेरी मतदार संघ हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसवांद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी साधलेला संपर्क यावरुन विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते. मात्र पोर्शे कार अपघातामध्ये आमदार सुनील टिंगरे यांच्यावर झालेले आरोप पहाता हा मतदार संघ भाजपला मिळावा यासाठी माजी आमदार जगदीश मुळीक प्रयत्न करत आहेत. सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या दोघांनीही महविकास आघाडीकडे आपल्या परीने फिल्डिंग लावली आहे. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँगेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडं जाणार असल्याने दोघांनीही शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यासह शहरांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सातत्याने संपर्क सुरू ठेवला आहे. दोघांनाही पक्ष प्रवेश करण्याच्या सुचना खुद पवार यांनी केल्या आहेत. त्यामुळे दोघांचीही चांगली गोची झाली आहे.
दोघांचा प्रवेश झाल्यास एकालाच संधी मिळणार असल्याने पुढे काय करायचे याची देखील चिंता भाजपमधून येणाऱ्या माजी आमदार आणि माजी नगसेवकाना असल्याने हे दोघेही सावध पाऊल उचलत आहेत.
महाविकास आघाडीमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदार संघ शिवसेना (उबाठा) सोडण्यात यावा यासाठी देखील खासदार संजय राऊत, नेत्या सुषमा अंधारे प्रयत्नशील आहेत. माहविकास आघाडी, महायुतीमधील सर्व पक्ष स्वतंत्र लढतील अशी देखील शक्यता असल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू ठेवली आहे.