कुर्हाडीने घाव घालून पतीने पत्नीचा केला खून
बुर्केगाव येथील धक्कादायक घटना
वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुर्केगाव परिसरात पत्नीचा कुर्हाडीने घाव घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मीबाई बाबा जाधव (वय ४५, बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती बाबा जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटूंब बुर्केगावात राहत होते. पती पत्नीमध्ये वाद होता. मध्यरात्री बाबा हे घरी आले. त्यांचा पत्नीसोबत वाद झाला. दरम्यान, मध्यरात्री बाबा यांनी पत्नी लक्ष्मीबाई यांचा कुर्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर बाबा देखील झोपला. दरम्यान, आई फोन उचलत नाही. ती कामावर देखील न आल्याने लक्ष्मीबाई यांची मुलगी घरी आली. तेव्हा घर बंद होते. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा बाबा जाधवराव हे झोपलेले होते. तर, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानूसार लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.