बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा

लोहगाव मधील शेतकऱ्यांची मागणी; उपमुख्यमंत्र्यानी दिल्या आयुक्तांना सुचना

पुणे : लोहगांव येथील प्रस्तावित रिंगरोड मध्ये बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य मोबदला मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष पांडूरंग खसे, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक (बापू) खांदवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सुचना देत शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा असे सूचित केले.

वाघोली ते लोहगाव-चऱ्होली असा रिंगरोड होणार आहे. त्यानुषंगाने रिंगरोडबाबत शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पुणे महानगरपालिका कार्यालयात झाली. सदर बैठकीमध्ये रिंगरोड मध्ये बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला ठरवण्याबाबत चर्चा झाली. मात्र चर्चेअंती कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जमिनींचा मोबदला एफएसआय व टीडीआरच्या माध्यमातून शेती झोन प्रमाणे देणार असल्याने शेतकरी नाराज आहेत.

सदर मोबदला प्रस्तावित निवासी झोन प्रमाणे रेडीरेकनरच्या दोन पटीत रोख स्वरूपात देण्यात यावा किंवा शेती झोन प्रमाणे रेडीरेकनरच्या पाचपट रोख स्वरूपात देण्यात देण्यात यावा अशी मागणी रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची आहे. शेजारील चऱ्होली व  वाघोली या गावात रेडीरेकनर दर १५ लाख असा असून तोच दर लोहगाव महानगरपालिका हद्दीत असताना देखील फक्त ५ लाख ८० हजार असा आहे. रेडीरेकनरच्या दरात असणाऱ्या मोठ्या तफावतीमुळे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

रेडीरेकरणाचा दर वाढवून मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून सूचना द्याव्यात अशी विंनती जेष्ठ नेते पांडूरंग खेसे, अशोक (बापू) खांदवे यांनी निवेदनाद्वारे केल्यानंतर अजित पवार यांनी आयुक्तांना लक्ष घालून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार रामभाऊ मोझे, राजेंद्र खांदवे, बंडू खांदवे, नवनाथ मोझे, अर्जुन गरुड, मिलिंद खांदवे, बाळासाहेब खांदवे, निलेश पवार, गणेश खांदवे आदि नागरीक उपस्थित होते.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page