शिरुर कोर्टाच्या आवारात करडे गावच्या माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा
पोलिसांचे दुर्लक्ष?; बांदल यांचेवर दाखल आहेत अनेक गंभीर गुन्हे

पुणे : शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असुन काही महिन्यांपुर्वी शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी सैनिकाने स्वतःच्या पत्नीवर गोळ्या झाडत तिची हत्या केली होती. त्यानंतर मंगळवारी करडे गावचे माजी उपसरपंचाने शिरूर कोर्टाच्या आवारात दारु पिऊन धिंगाणा घालून शिवीगाळ केली. या प्रकाराबाबत एका न्यायधीशांनी पोलिसाला कारवाईचे आदेश दिले. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, मंगळवार (दि १६) रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास करडे गावचे माजी उपसरपंच आणि स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ अंकुश बांदल यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात दारुच्या नशेत धिंगाणा घालत शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही वकिलांनी अंकुश बांदल यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु बांदल यांनी शिवीगाळ चालुच ठेवली. त्यानंतर शिरुर न्यायालयातील एका न्यायाधिशांनी (नाव माहित नाही) कोर्ट पोलीस कर्मचाऱ्याला बांदल यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु शिरुर पोलिसांनी बांदल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.
बांदल यांचेवर दाखल आहेत गंभीर गुन्हे
अंकुश बांदल यांच्यावर यापूर्वीही शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही गुन्ह्यात बांदल हे जामीनावर बाहेर आहेत. आता त्यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ करुनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली का? कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का? अशी सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.