सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून
येरवडा येथील घटना; पोलिसांनी केली तिघांना अटक
येरवडा : येरवड्यात पूर्ववैमन्यास्यातून एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटूंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
सुधीर चंद्रकांत गवस (वय २३, रा. जयप्रकाश नगर, येरवडा) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. तर आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय ४४), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय २८) तसेच रवी किरण रामचंद्र आचार्य (वय ३५ तिघेही रा. जयप्रका नगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस ठाण्यात देखील दाखल होते. काही दिवसापूर्वीच तो जेल मधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरु केला. बुधवारी (१७ जुलै) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मयत सुहास हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असताना त्याला गाठून तिघांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, अंगावर, चेहऱ्यावर तीक्ष्ण वार केले. या हल्ल्यात सुधीर याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी येरवडा पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. गौरी धर्मेंद्र शिंदे (वय ३५ रा. जय प्रकाश नगर, येरवडा) यांनी फिर्यादीवरून तिघांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सुधीर गवस याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक विशाल टकले करत आहेत.