वाघोली येथील माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी ओपन जीम
शासननियुक्त नगरसेवक शांताराम कटके व संदिप सातव यांच्या हस्ते उदघाटन

वाघोली : माध्यमिक आश्रमशाळा वाघोली येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेतील ओपन जीमचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाघोलीतील शासननियुक्त नगरसेवक शांताराम कटके व संदिप सातव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिमची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी शांताराम बापू कटके व संदिप सातव यांची शासननियुक्त नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे अध्यक्ष शिवलाल जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शांताराम कटके यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर संदीप सातव यांनी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या पहिल्या वसतीगृहाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी या जिमचा उत्तम प्रकारे उपयोग करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शारीरिक सक्षमता वाढवावी असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे यांनी केले.
यावेळी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे, विठ्ठल शिंदे, गणेश रहाणे, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ शिरोरे व आभार प्रदर्शन विजय फापाळे यांनी कले.