लोहगाव मध्ये जिकडे-तिकडे कचराच कचरा
दोन जणांची बदली करुन देखील कचरा ‘जैसे थे’
लोहगाव : लोहगाव मधील कचऱ्याबाबत लोहगाव विकास आघाडीने आवाज उठवल्यानंतर विभागीय आरोग्य निरिक्षक, मुकादम यांची बदली झाली. मात्र तरी देखील लोहगाव मधील कचऱ्याचे ढीग काही कमी होताना दिसत नाहीत. कचरा समस्येने लोहगावकरांना ग्रासले असून जिकडे-तिकडे कचराच-कचरा असे चित्र लोहगावमध्ये पहायला मिळत आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून कचरा समस्या मार्गी लावावी अशी मागणी लोहगाव विकास आघाडीने घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे केली आहे.
लोहगाव मध्ये सुमारे ४५ ठिकाणी कचरा पडला जातो. स्वच्छ संस्था मार्फत घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. याशिवाय महापालिकेच्या घंटागाडीद्वारे देखील कचरा गोळा केला जातो. मात्र लोहगावचा वाढलेला विस्तार पहाता कचरा सर्व ठिकाणी जाऊन जमा करने अशक्य होत आहे. गाडी वेळेवर येत नसल्याने तसेच कचरा नेणाऱ्यास पैसै द्यावे लागतात म्हणून नागरीक कचरा रस्त्याकडेला फेकून देत आहेत. सुमारे ४५ ठिकाणी कचरा पडण्याची ठिकाणे आहेत. याशिवाय हॉटेल, भाजी विक्रेते, चिकन, मास विक्रेते अशा सर्वांचा कचरा रस्त्या कडेला पडत आहे.
लोहगाव विकास आघाडीच्या वतीने लोहगाव हद्दी बाहेरील कचरा आणून लोहगाव मध्ये खाली करत असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानतंर याला जबाबदार धरत विभागीय आरोग्य निरिक्षक हणमंत साळवे, मुकादम सुरेश उबाळे यांची लोहगाव मधुन बदली करण्यात आली. मात्र त्यानतंर सर्व यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आरोग्य निरिक्षक व नव्याने आलेले मुकादम यांच्यात समन्वय नाही. कोटीत काम करणारा बिगारीच आरोग्य निरिक्षक झाल्यासारखा वावरत आहे. आरोग्य निरीक्षक यांचा वचक नसल्याने सफाई कर्मचारी काम करत नाहीत. आरोग्य विभागात कामाबाबत सावळा गोंधळ असल्याने कचऱ्याचे ढीग सर्वत्र दिसून येत आहेत. बाहेरील कचरा गाड्या पुन्हा लोहगाव मध्ये खाली होत आहेत. नव्याने आलेले आरोग्य निरीक्षक जिकडे आपला वैयक्तिक फायदा आहे त्याठिकाणी काम करत असल्याने दैनदिंन कामकाज पेंडिग रहात असल्याने कचरा वाढत आहे.
लोहगाव मधील कचरा कमी होणेसाठी कायम स्वरुपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी लोहगाव विकास आघाडीने केली आहे.
लोहगाव विकास आघाडीचे प्रशांत जगताप म्हणाले, संपूर्ण लोहगाव स्वच्छ झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यासाठी पाठपुरावा करत रहाणार आहोत. जे अधिकारी, कर्मचारी काम करत नाहीत त्यांची बदली किंवा निलंबनाची मागणी सातत्याने रहाणार आहे.
आरोग्य निरीक्षक जगदीश साळवे यांच्याशी संपर्क केला असता या भागासाठी मी नवीन आहे. कचरा समस्या अधीक असल्याने यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. जेसीबी उपलब्ध झालेनंतर कचरा पडणारी सर्व ठिकाणे स्वच्छ करून पुन्हा दुसरा पडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे सांगितले.