नियम न पाळणाऱ्यांना गुलाब पुष्प देवून समज
वाहतूक पोलिसांची गांधीगिरी; शुक्रवार पासून केली जाणार कडक कारवाई; नियमांबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती

वाघोली : लोणीकंद वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला असून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना गुलाब पुष्प देवून समज दिली. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांच्या फलकाद्वारे विविध चौकातील सिग्नलवर जनजागृती जागृती केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शुक्रवार पासून वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. महामार्गावर बेशिस्त वाहने पार्क करणे, विरुद्ध दिशेने भरधाव वाहन चालवणे, ट्रिपल सीट, विना परवाना व मद्य प्राशन करुन वाहन चालवणे, सिग्नलचे पालन न करणे आदी कारणांमुळे अपघाताबरोबरच दैनंदिन कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे लोणीकंद वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर असून नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी सज्ज झाले आहेत. वाहतूक पोलिसांकडून गुरुवारी (१५ फेब्रुवारी) वाघेश्वर चौक ते आव्हाळवाडी फाटा व बीजेएस ते मॅजेस्टीक सोसायटीला विरूद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांनी विरूद्ध दिशेने न जाता योग्य त्या मार्गाचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्यांना गुलाब पुष्प देवून समज देण्यात आली.
लोणीकंद वाहतूक विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक गजाजन जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे, पोह संदीप पाटील, बी एस खेडकर स्वप्नील गालफाडे, राजेंद्र माने, जान्वी लामखडे, सुनिता पौळ, बी टी राख, एस डी गिरे यांनी नियमांबाबत जनजागृती केली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देवून समज देण्यात आली. समज देवून देखील नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.
– गजानन जाधव (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, लोणीकंद)