नगर रोडवर वाघोलीत ट्रक बंद पडल्याने सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी
दोन्ही बाजूने काही किलोमीटर पर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांग
वाघोली : पुणे-नगर रोडवर वाघोलीतील उबाळेनगर बस स्टॉप समोरील वळणावर सिमेंटची वाहतूक करणारा मोठा ट्रक बुधवारी (दि. ७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद पडल्याने वाघोलीकर व वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुणे बाजूकडून नगरकडे जाणाऱ्या लेनवर मधोमधच ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूने काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. हा ट्रक ढकलून बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली असली तरी सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
वाघोलीतील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी पुणे-नगर रोडवर वाहने बंद पडल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. महामार्गावर अशी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.