वाघोलीतील मनपा शाळांचा होणार कायापालट
पालकांमध्ये समाधान आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य

वाघोली : वाघोलीतील मनपा शाळा क्रमांक १ व २ च्या प्राचार्या अनिता मोरे व भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या प्रयत्नांमुळे शाळांच्या नुतनीकरणाला गती मिळाली आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
वाघोली परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १ व २ या शाळांमध्ये सध्या सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असली तरी, या शाळांच्या पायाभूत सुविधा अभावी दयनीय अवस्था झाली होती. फुटलेल्या व टोकदार फरश्या, मोडकळीस आलेले दरवाजे आणि खिडक्या, भिंतीवरील उध्वस्त रंग, तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात आले होते.
शाळेच्या प्राचार्या अनिता मोरे यांनी या समस्येकडे सातत्याने लक्ष घालून पुणे महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. स्थानिक लोकप्रतिनिधींची यामध्ये सहकार्य मिळाले. भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांमुळे अखेर या शाळांच्या नुतनीकरणाला गती मिळाली आहे.
शाळेच्या नुतनीकरणात आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. नवीन टाइल्स, मजबूत लाकडी व स्टील दरवाजे, स्लाइडिंग खिडक्या, सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आणि शाळेच्या संपूर्ण इमारतीचे रंगरंगोटी केली जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या बाबींचा विचार केला जात आहे.
शाळा ही केवळ शिक्षण घेण्याची जागा नसून, ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारी प्रयोगशाळा असते. म्हणूनच त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण देणे ही सामूहिक जबाबदारी आहे. शाळांच्या नुतनीकरणासाठी प्रशासनाचेही तातडीने सहकार्य लाभले आहे.
– संदीप सातव (जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पुणे)