वन उद्यानाच्या निर्मितीसाठी तातडीने निधी द्या
वाडेबोल्हाई ग्रामस्थांसह सरपंच दीपक गावडे यांची मागणी

वाघोली : (राहुल बागल) वाडेबोल्हाई येथे बोल्हाई मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी याठिकाणी येतात. वाडेबोल्हाई (वाडेगाव) येथे वनविभागाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर असल्याने वाडेबोल्हाई ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वन उद्यान करण्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे वन उद्यान मंजूर करण्यात आले. परंतु निधी अभावी वन उद्याचे काम सुरु झाले नाही. लवकर शासनाने निधी उपलब्ध करून वन उद्यानाचे काम सुरु करावे अशी मागणी वाडेबोल्हाई गावचे सरपंच दीपक गावडे यांनी केली आहे.
वाडेबोल्हाई येथे मोठ्याप्रमाणावर वन विभागाचे क्षेत्र असून वाडेगाव (गट नं. ८२८, ८३०) वन उद्यान निर्मितीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सन २०१८ पासून पाठपुरावा चालू होता. शासनाने पाठपुराव्याची दखल घेत सन २०२२-२३ ला वन उद्यान विकसित करणेसाठी मंजूर दिली. वन उद्यानामध्ये वनप्राणी शिल्प, फुलपाखरू उद्यान, लाकडी पॅगोडा, बांबू बेंचेस, ग्रीन टनेल, देवी देवतांचे आराध्य वृक्षावन, रॉक गार्डन, संरक्षण पथ, लाकडी तराफा, पाणी पुरवठा आदी प्रस्तावित बाबींचा समावेश असणार आहे. वन उद्यान विकसित झाल्यास वाडेबोल्हाईच्या वैभवात भर पडणार आहे.
परंतु निधी अभावी अद्यापही काम सुरु करण्यात आले नाही. या ठिकाणी पर्यटक, निसर्गप्रेमी, संस्था, शाळांच्या शैक्षणिक सहली भेट देत असतात. त्यामुळे वाडेबोल्हाई येथे वन उद्यान विकसित झाल्यास संरक्षणाच्या देखभाली करिता पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. वाढत्या नागरीकराणांमुळे वन क्षेत्रात अतिक्रण सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरच वन उद्यान विकसित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह शिरूर-हवेलीचे दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिफारस केली होती. तसेच शिरूरचे आमदार अशोक पवार हे देखील आग्रही असून खा. अमोल कोल्हे यांनी सुद्धा शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. त्याबरोबर वन विभागाकडून सुद्धा अहवाल सादर करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून लक्षवेधी मांडली जाईल अशी अपेक्षा होती. परंतु वाडेबोल्हाई ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांसह भाविकांच्या पदरी निराशाच आली. वन विभागाशी संपर्क केला असता प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये काही पूर्तता आहे. पूर्तता करून प्रस्ताव परत पाठवण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी सांगितले.
वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘अमृतवन’ या संकल्पनेतून वन उद्यान निर्मिती झाल्यास खऱ्या अर्थाने दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्याबरोबर पंचक्रोशीतील भाविकांना पर्यटणासाठी फायदा होईल.
– दीपक गावडे (सरपंच, वाडेबोल्हाई)