वाघोली-लोहगाव रस्त्याची दयनीय अवस्था
रस्ते झाले जलमय; खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला

वाघोली : वाघोली-लोहगाव हा केसनंद मार्गे राहूला जोडणारा राज्य मार्ग असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडले आहेत. पावसाचे दिवस असल्यामुळे खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे व रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वाघोली गाव महापालिकेत गेल्यामुळे अनेकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले असून समीकरण जुळवण्यासाठी बैठका सुरु आहेत. परंतु नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठका घ्याव्यात अशा सूर नागरिकांमधून उमटताना दिसून येत आहे. भावी नगरसेवकासाठी खऱ्या अर्थाने एक आव्हानच आहे.
वाघोली-लोहगाव हा राज्य मार्ग असून या रस्त्यावर सोसायट्या, शाळा, महाविद्यालये असून लोहगाव विमानतळाशी जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने नेहमी वर्दळ असते. वाघोली ते लोहगाव या रस्त्याची खड्यांमुळे मोठी दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्याला पुराचे स्वरूप आल्यामुळे विशेषतः दुचाकी धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. पाण्यामधून वाट काढताना अनेकवेळा अंदाज न आल्यामुळे छोटेमोठे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याला पुराचे स्वरूप येत आहे. खरे तर मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवलेली असताना देखील संबधित विभाग जागा झालेला दिसून येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे काम करणे गरजेचे आहे. संबधित अधिकारी एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
भावी नगरसेवकासाठी संधी
वाघोली गाव महापालिकेत समाविष्ट होताच अनेकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले आहेत. आतापासूनच बैठका सुरु असून समीकरणाची आखणी सुरु आहे. पावसाळा सुरु झाला तेंव्हापासून वाघोली-लोहगाव रस्त्यावरील नागरिक रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करताहेत. परंतु अद्यापही भावी नगरसेवकाचे लक्ष नसल्याचे दिसून येते. खरे तर भावी नगरसेवकासाठी रस्ता दुरुस्तीची चांगली संधी आली असून या संधीचा कोणता भावी नगरसेवक संधीच सोन करतो याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागिले अनेक वर्षांपासून खड्यांमुळे अतिशय गंभीर स्थिती झाली आहे. जेष्ठ नागरी, महिलांसाठी हा रस्ता जीवघेणा झाला असून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
– गजानन पांचाळ (सामाजिक कार्यकर्ते, वाघोली)