सर्व मार्गासाठी एक दिवसीय दैनिक पास सुरू करण्याची मागणी

आमदार अतुल बेनके यांचे पीएमपीचे अध्यक्ष यांना निवेदन  

 पुणे :  पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी वर्गासाठी पीएमपीएमएलच्या सर्व मार्गासाठी एक दिवसीय दैनिक पास सुरू करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या दैनंदिन प्रवासामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ४० रुपयांचा दैनिक पास सध्या प्रवासीवर्गासाठी देण्यात येतो तर दोन्ही मनपा हद्दीत ५० रुपयांचा पास सुरू आहे. या दैनिक पासला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु ग्रामीण भागातील पीएमपीएमएल प्रवासी वर्गासाठी पुर्वी एक दिवसीय दैनिक पास ७० रुपयांचा होता. सदरचा पास गेली अनेक महिन्यांपासून बंद आहे. ग्रामीण भागात पीएमआरडीएच्या हद्दीत पण मोठ्याप्रमाणावर पीएमपीएमएल बससेवा सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासीवर्ग सदरचा पास सुरू करणेबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्याकडे मागणी करत आहे.

ग्रामीण भागातील, आळेफाटा नारायणगाव, मंचर, शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, लोणावळा, राजगुरूनगर चाकण, मोरगाव, जेजुरी, सासवड, पौड, खेड शिवापूर, आदी भागांतून नागरिक मोठ्यासंख्येने कामानिमित्ताने पीएमपीएमएलने पुणे, पिंपरी चिंचवड शहरात प्रवास करतात. परंतु एक दिवसीय पास दैनिक सुरू नसल्याने प्रवासीवर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. शहरातील अनेक प्रवासी वर्गही ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग शहरात कामानिमित्ताने प्रवास करत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी वर्गासाठी पीएमपीएमएलच्या सर्व मार्गासाठी एक दिवसीय दैनिक पास सुरू करणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button