लवकरच वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संदीप सातव यांना आश्वासन

पुणे : वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाघोली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली होती. परंतु अद्यापही प्रस्ताव कागदावरच असल्याने भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून वाघोली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यान्वित केले जाईल असे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी सातव यांना दिले.
वाघोली गावच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने वाघोली येथे नवीन पोलीस स्टेशनला मंजूरी देण्यात आली होती. परंतु आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, त्यासाठी अपेक्षित खर्चाची तरतूद आणि पोलिस स्टेशन रचना, हद्द यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव करून कागदोपत्री मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु सदर प्रस्ताव प्रलंबित असून त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. लवकरच वाघोली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यान्वित करावे या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेतली. भेटी दरम्यान गृहमंत्री फडणवीस यांनी सातव यांच्या मागणीची दखल घेवून लवकरच पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच केसनंद गावाचे सरपंच दत्ता आबा हरगुडे यांनी सुद्धा फडणवीस यांना विविध विकास कामांबाबत निवेदन दिले व विकास कामांबाबत चर्चा केली.