वाघोलीतील विविध मुलभूत प्रश्नांबाबत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी
वाघोली गावाच्या विकासकामांबाबत लवकरच आढावा बैठक घेणार : मंत्री उदय सामंत
वाघोली : महापालिकेत समाविष्ट होऊनही वाघोली गावाला भेडसावणाऱ्या रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, कचरा व विविध समस्यांबाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांनी मुंबई येथे विधानसभेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. वाघोली गावातील या मूलभूत सोयीसुविधा व विकासकामाबाबत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीला उत्तर देताना विधानसभेत सांगितले.
आमदार अशोक पवार यांनी वाघोली गावातील मूलभूत सोयीसुविधा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडत असताना विविध समस्यांबाबत विधानसभेत प्रश्न विचारले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, वाघोली गावाची साडे तीन लाख लोकसंख्या आहे. याठिकाणी आयव्ही इस्टेट रोड, बकोरी रोड व फुलमळा रोड येथील रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असल्याने यातून नागरिकांची सुटका झाली पाहिजे. पीएमआरडीए विकासकांना परवानगी कशी देते. यात गैरव्यवहार झाला आहे अशी शंका निर्माण होते. पीएमआरडीएकडे सार्वजनिक विकासाच्या जागा उपलब्ध असूनही त्या पीएमसीकडे का दिल्या जात नाही? डीपी प्लॅनची वाट का पाहिली जाते? डीपी प्लॅन हा वेळेतच झाला पाहिजे.
मोठे गाव असताना त्याठिकाणी २२० केव्हीचं एमएसईबीचे सबस्टेशन पाहिजे. त्याच्या जागेचा प्रश्न हा पीएमआरडीए व पीएमसीने सोडवला पाहिजे. गावात पोलीस स्टेशन नाही, सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी काही उपाययोजना नाही, गावाला एसटीपीची सोय हवी. तसेच गावात घनकचरा प्रकल्प उभं राहणं गरजेचं आहे.
वाघोलीत जवळपास १०० एकरावर झोपडपट्टी वसाहत आहे. मुंबईप्रमाणेच वाघोली गावातही काही योजना आणून चांगली घरं बनवावी. याठिकाणी ३७५ हौसिंग सोसायट्या आहेत. येथील लोकांना टँकरसाठी दरमहा १५ कोटी रुपये खर्च करावे लागतात. एका वर्षात १८० कोटी जर सामान्य माणसाला खर्च करावे लागत असतील तर त्यांना न्याय कोण देणार? असे प्रश्न आमदार पवार यांनी मांडले.