पाण्यासाठी महिलांनी केले आंदोलन
हातात हंडा व फलक घेऊन 'वाघोलीकरांची तहान भागवा'च्या दिल्या घोषणा

वाघोली : पाणी द्या नाहीतर टॅक्स नोटीस वापस घ्या, वीस वर्षापासून पाण्याविना असलेल्या वाघोलीकरांची तहान भागवा अशा घोषणा देत वाघोलीत महिलांनी सीमाताई गुट्टे यांच्या नेतृत्वात हातामध्ये हंडा व फलक घेऊन खांदवे नगर बस स्टॉप येथे नगर रोडवर उतरून आंदोलन केले. यावेळी. सरकारच्या तसेच महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थित केला नाही किंवा प्रशासकीय स्तरावर टँकर पुरविले गेले नाही तर आठ दिवसात महापालिकेच्या दालनात जाऊन हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मनपा पाणीपुरवठा अधिकारी अन्वर मुल्ला यांनी उबाळे नगर भागात तात्पुरती सोय करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात सिंटेक्सच्या टाक्या बसवण्यात येतील असे आश्वासन महिलांना दिले.
केवळ सिंटेक्सच्या टाक्या बसवून समस्या सुटणार नाही. कायमस्वरूपी पाण्याच्या प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. टॅक्स नोटीस दिली जाते परंतु सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
– सीमा गुट्टे (महाराष्ट्र कॉंग्रेस सदस्या)
यावेळी सीमाताई गुट्टे, सारीका वीर, सारीका वर्मा, सुचित्रा साखरे, अलका पाटोळे, भारगजे ताई, पुनम ठाकुर, अनिता बुरसे, मेजर सावरे, संजय कलोरे, विवेक वाडेकर, रमा आठवले, रश्मी सिन्हा, मिसेस नीली यांचेसह रहिवाशी उपस्थित होते.