वाघोली प्रा. आ. केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मान्यता
आरोग्य विभागाने काढले आदेश; ३० खाटांचे असणार ग्रामीण रुग्णालय

वाघोली : वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘एक विशेष बाब’ म्हणून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे. याठिकाणी ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यास नुकतीच शासनाने मान्यता दिली असताना ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करण्यात आले असल्याने वाघोलीसह परिसरातील गावांच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास ‘एक विशेष बाब’ म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाकरिता विहीत पध्दतीने जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश आरोग्य विभागाचे सह सचिव अशोक अत्राम यांनी काढले आहेत. दोन आठवड्यापूर्वीच सिव्हिल हॉस्पीटल व ट्रॉमा सेंटर मान्यता दिली असतानाच आता ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेणे सोपे होणार आहे.
सिव्हिल हॉस्पीटल व ट्रॉमा सेंटर बरोबरच प्रा. आ. केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे निश्चितच वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणाऱ्या गरजू व गोरगरीब रुग्णांना आजारांचे निदान करण्यासाठी एक्स-रे, सिटी स्कॅन यासह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
– रामदास दाभाडे (माजी जि.प. सदस्य)
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर यश मिळाले आहे.
– संदीप सातव (माजी उपसरपंच, वाघोली)
ग्रामीण रुग्णालयामुळे स्त्रिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, सर्जन, ओर्थोपेडीक आदी विविध तज्ञ उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. विविध प्रकारांच्या आजारांवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गरजू व गोरगरीब रुग्णांना आवश्यक सुविधा मिळणार असल्याने अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.
– मोहन (आप्पा) शिंदे (पुणे जिल्हा सचिव, भाजप)