अंमली पदार्थ सेवनाविरोधात रॅलीद्वारे जनजागृती
वाहतूक विभाग व श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या वतीने नशामुक्ती अभियान
वाघोली : पुणे शहर पोलीस आयुक्तालय लोणीकंद वाहतूक विभाग व श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या वतीने सोमवारी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशामुक्ती जनजागृती अभियान राबवण्यात आले.
दिवसेंदिवस तरुणाईभोवती अंमली पदार्थांचा फास घट्ट होत आहे. यामध्ये तरुणाई कधी मजामस्ती तर कधी ताणतणाव दूर करण्याच्या नावाखाली नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाने शारीरिक व मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी लोणीकंद वाहतूक विभाग व श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या वतीने सोमवारी (दि. १०) विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थां विरोधात घोषणाबाजी करत जनजागृती केली. ८० ते ९० विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातातील फलकांद्वारे अंमली पदार्थांपासून दूर राहा असा जागृततेचा संदेश दिला.
ही रॅली केसनंद फाटा ते आव्हाळवाडी चौक, लाईफ लाईन हॉस्पिटल, केसनंद रोड मार्गे काढून केसनंद फाटा वाहतूक विभाग येथे समाप्त झाली. रॅलीचे आयोजन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग) जगदीश सातव यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले होते. वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांनी अंमली पदार्थ सेवन केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
या रॅलीमध्ये वाहतूक विभागाचे कर्मचारी, श्री चैतन्या टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा जोसेफ, उपमुख्याध्यापिका नागालक्ष्मी, शाळेचे डिन मनीशंकर अय्यर, यशोदा कृष्णा, काव्या कामसु, दादासाहेब मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे, स्वप्नील पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
अंमली पदार्थांच्या सेवनाकडे तरुणाई वळली असून दिवसेंदिवस हा फास घट्ट होत चालला आहे. कोकेन, गांजा, अफिम, ब्राऊन शुगर आदी अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. युवा, युवती नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
– जयंत पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)