७२ तासांत ९ महिलांची नॉर्मल प्रसूती
वाघोली प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांची माहिती
वाघोली : सरकारी दवाखान्यात योग्य उपचार मिळत नाहीत असा सर्वसामान्यांचा समज आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेकजण टाळतात. पण वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ७२ तासांमध्ये ९ महिलांची नॉर्मल प्रसूती केली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये महागडी उपचार घेऊनही खाजगी डॉक्टरांचा कल सिझेरियनकडे असतो. वाघोलीतील आरोग्य केंद्राच्या टीमने केलेल्या नॉर्मल प्रसूतीमुळे सरकारी दवाखान्याकडे महिला व सामान्य वर्गाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे दिसून येते.
गरोदरपणा हायरिस्क मानला जातो. त्यामुळे सरकारी दवाखान्याऐवजी भरमसाठ पैसे मोजून खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी नागरिक पसंती दर्शवितात. वेळप्रसंगी खाजगी रुग्णालयातील डॉक्टर सिझेरियन करण्यास सल्ला देतात. भीतीपोटी नागरिक सिझेरियन करण्यासाठी राजी होत असतात. या उलट शासकीय रुग्णालयात शेवटच्या घटकेपर्यंत नॉर्मल प्रसूतीचा प्रयत्न डॉक्टरांकडून केला जातो. त्यामुळे बहुतांशवेळा डॉक्टर यशस्वी देखील होतात.
वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील असाच सुखद अनुभव आला असून मागील ७२ तासांमध्ये ९ महिलांची नॉर्मल प्रसूती झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी सांगितले. आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफने यामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. नॉर्मल प्रसूती झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर देखील हास्याचे भाव होते.