कचऱ्याची समस्या मार्गी लावणार – आमदार बापूसाहेब पठारे
अतिरिक्त महापालिका आयुक्तांसोबत केली मतदारसंघाची पाहणी; विकासाच्या मुद्द्यांवर आमदार पठारे ॲक्शन मोडवर
विश्रांतवाडी : कचऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन कठोर पावले उचलणार असून समस्या मार्गी लावणार आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, संकलन आणि व्यवस्थापन करणे हे मतदारसंघाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यावश्यक असल्याचे मत नवनियुक्त आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत येरवडा, कळस येथील कचरा हस्तांतरण केंद्राची पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब धापटे, विठ्ठल देवकर,श्रीपती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हस्के, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, बंटी म्हस्के, आपचे अमित म्हस्के, विशाल धापटे, गणेश ढोकले, नरेंद्र बिडवे, विशालबाबा धापटे, अभिजित सुर्वे, उषा कांबळे, सुप्रिया वाजे, अनिल शिंदे, किरण म्हस्के, विविध गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
निवडणूक प्रचारादरम्यान येरवडा, कळस भागातील नागरिकांनी कचरा समस्या सोडवण्याची मागणी केली होती. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही पाहणी पार पडली. कचरा व्यवस्थापनासाठी ‘इंदौर पॅटर्न’ सारख्या ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले. पाहणी दरम्यान येरवडा भागातील कचरा हस्तांतरण केंद्राची सुधारणा करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील कचरा तातडीने उचलावा, कचरा गाड्यांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती करून पर्यायी व्यवस्थेचीही सोय करावी, कळस येथील दाट नागरीवस्तीच्या ठिकाणी असलेले कचरा वर्गीकरण केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे असा आदेश पठारे यांनी पालिका प्रशासनाला दिला. यावर योग्य उपाययोजना करून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.
कळस येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यामागे असलेली उघडी ड्रेनेज लाईन बंदिस्त करावी, कळस येथील शाळांमधील उद्यान मुलांना वापरण्यासाठी उपलब्ध करावे, कळस येथील बॅास्केटबॅाल कोर्ट सर्व सोयी-सुविधा देऊन चालू करावे तसेच त्या ठिकाणी असलेले अवैधधंदे बंद करावे, कळस येथील लिकेज असलेली नव्याने बांधलेली पाण्याची टाकी दुरूस्त करावी, स.न. ११८ डीपी रस्ते लवकरात लवकर सुरू करावे याही सूचना यावेळी त्यांनी केल्या. आमदार पठारे यांच्या कामाबाबत मतदारसंघातील नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. योग्य उमेदवाराला मतदान केल्याचे समाधान वाटत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.