वडगावशेरीच्या आमदारांनी प्रशासनाची उडवली झोप
भल्या सकाळी ऐकाव्या लागतात समस्या; अधिकारी, कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
लोहगाव : (उदय पवार) वडगावशेरी मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा दिनक्रम पहाटे सुरू होत असून मागील आठ दिवसांपासून त्यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठका घेतल्या. समस्या जाणून घेण्यासाठी आणि विकास कामे मार्गी लावण्यासाठी ते अधिकाऱ्यांना घेऊन सकाळी साडेसहा वाजताच फिल्डवर असतात. एरवी वेळेत हजर न रहाणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमदारांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सकाळी सहा वाजताच उपस्थित राहावे लागत आहे. रोजच मतदार संघातील वेगवेगळ्या भागात भेटी दिल्या जात असल्याने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे. सकाळी लवकर आमदार आपल्या भागात येत असल्याने कार्यकर्त्यांनाही डोळे चोळत उपस्थित राहावे लागत आहे.
आमदार पठारे यांनी शनिवारी (दि. ७ डिसेंबर) शपथ विधीला मुंबईला जाण्या अगोदर सकाळी ६.३० वाजता लोहगाव येथील आरोग्य कोठीला भेट दिली. कचरा नियोजनाचे काम आणखी वेगाने करण्यासाठी लोहगावात आणखी कामगार भरती करणे व कचरा गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांना सूचना आमदारांनी केल्या. सर्व रस्ते, स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सांगितले. लोहगावतील बस स्टॉप चौक व वाघोली रोड स्मशानभूमी येथील विक्रेत्यांना हलवून तो बाजार तळावर नेण्यास सांगितले. त्यामुळे तेथील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. बाजार तळ स्वच्छ करण्यास सांगितले. पाण्याच्या टाकीच्या कामाच्या दिरंगाई बद्दल पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना व ठेकेदारास खडे बोल आमदारांनी सुनावले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या टाक्यांची क्षमता वाढवून कमी कालावधीत काम करण्याच्या सूचना देखील केल्या. संपूर्ण परिसराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करू, पोरवाल रोडचे टँकर बंद करू, एक वर्षाच्या आत लोहगावतील सर्व रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज पूर्ण करू असे आमदारांनी सांगितले. लोहगाव स्मशानभूमी ते संत नगर रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, उप अभियंता रवींद्र पाडाळे, शाखा अभियंता सुधीर आलुरकर, आरोग्य निरिक्षक गोपाळकृष्ण नायडू, राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे- मास्तर, भानुदास खांदवे, सुभाष काळभोर, रामभाऊ खांदवे, सुनीलदादा खांदवे, सोमनाथ मोझे, सागर खांदवे, प्रकाश खांदवे, दगडू खांदवे, निलेश पवार, श्रीकांत खांदवे, एकनाथ खांदवे, दिपक खांदवे, रमेश तळेकर, केशव राखपसरे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आमदार पठारे यांनी मतदार संघात अधिकाऱ्यांना सोबत सकाळी ६, ६.३० वाजता भेट देऊन समस्या मार्गी लावणे, विकास कामे करणे सुरू केल्याने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना वेळेत सकाळी लवकर येऊन हजर रहावे लागत आहे. आरोग्य कोटी वरील सफाई कर्मचारी, मुकादम, आरोग्य निरिक्षक वेळेत येतात की नाही, काम करतात की नाही याची पहाणी आमदार सकाळी सहा वाजता सर्वच आरोग्य कोटी वर जाऊन करत असल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे.