सोनसाखळी चोरी करणाऱ्यास अटक
लोणीकंद पोलिसांची कामगिरी; १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांनी तपासले ८० ते १०० सीसीटीव्ही
वाघोली : खरेदीचा बहाणा करुन जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरटयास लोणीकंद पोलिसांनी येरवडा येथील कॉमर्स झोन परिसरात गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवून जेरबंद केले आहे. त्याचेकडुन एकुण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रोहन सतिश जाधव (वय २८ रा. हरपळे नगर, फुरसुंगी रोड, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २८ नोव्हेंबर रोजी मोटर सायकलवरील एका अनोळखी इसमाने पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील कपडे विक्री दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची जबरदस्तीने चोरी केली होती. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस तपास करत होते.
लोणीकंद पोलिसांनी पिंपरी सांडस, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, हडपसर, फुरसुंगी, मगरपटटा, घोरपडी, कल्याणी नगर, येरवडा परिसरातील आरोपींचे पळून जाण्याचे मार्गावरील एकूण ८० ते १०० खाजगी सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन आरोपीच्या वर्णनावरुन गोपनीय बातमीदारामार्फत कौशल्यपुर्वक माहिती प्राप्त केली. त्यानुसार आरोपीला पुण्यातील येरवडा येथील कॉमर्स झोन परिसरातील गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकलसह ताब्यात मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याची चैन चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याचेकडून एकुण १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव, सहा पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार सागर जगताप, कैलास साळुंके, अजित फरांदे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साईनाथ रोकडे, अमोल डोणे, शुभम चिनके, सुधीर शिवले यांनी केली आहे.