कंत्राटी कामगारांना दिले जात आहे कमी वेतन
नवीन ठेकेदाराबद्दल कंत्राटी कामगारांमधून नाराजीचा सूर; अनिल सातव पाटील यांची मनपा सहा आयुक्तांकडे योग्य वेतन देण्याची मागणी
वाघोली : महापालिकेतील आरोग्य व ड्रेनेज कोठी या दोन्ही विभागातील वाघोली परिसरातील जवळपास शंभराहून अधिक कामगार काम करता. जुन्या ठेकेदाराकडून मिळणाऱ्या वेतनापेक्षा नवीन कंत्राटी सेवक ठेकेदाराकडून कमी वेतन मिळत आहे. वेतन कमी देण्याबाबत नवीन ठेकेदार कुठलीही माहिती देत नसल्याने कामगारांनी भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांचेकडे धाव घेतली. अनिल सातव पाटील यांनी कामगारांची बाजू जाणून घेत नगर रोड मनपा क्षेत्रीय कार्यालयाचे सहा आयुक्त संजय पोळ यांना लेखी निवेदनाद्वारे कामगारांना योग्य वेतन देण्यात यावे व वेतन कपात करणाऱ्या संबधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पुणे महापालिकेतील आरोग्य कोठी व ड्रेनेज कोठी या दोन्ही विभागात झाडू, कचरा, कचरा गाडीवरील हेल्पर, गटार लाईन साफसफाई करणारे वाघोली परिसरातील जवळपास १३९ कामगार काम करीत आहेत. हे सर्व कामगार कंत्राटी ठेकेदार सिद्धीविनाक एन्टरप्रायजेस या कंत्राटी कंपनीमार्फत कामास आहेत. नवीन ठेकेदार बदली होण्यापूर्वी जुन्या कंत्राटी ठेकेदरामार्फत कामगारांना सुट्ट्या वगळता २६ दिवसांसाठी १७,७१५ रुपये मासिक वेतन मिळत होते. परंतु ऑक्टोबर २०२४ नंतर नवीन सेवक कंत्राटी ठेकेदाराकडून कामगारांना सुट्या वगळता मासिक वेतन १६,८०० देण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई बघता वेतन वाढ होणे गरजेचे असताना आहे तेवढे वेतन सुद्धा न देता त्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आली. त्यामुळे कामगारांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
ऑक्टोबर महिन्यातील कामगारांना ठरल्याप्रमाणे वेतन मिळत नसल्याचे कंत्राटी सेवक ठेकेदाराकडे विचारणा केली असता विमा काढला असल्याचे कामगारांना सांगितले. परंतु कामगारांचा काढण्यात आलेल्या विम्याबद्दल काहीही सविस्तर माहिती देण्यात आली नसल्याचे कामगारांकडून सांगण्यात येते. कामगारांना नोव्हेंबर महिन्याचा देखील पगार कमी आलेला आहे.
वेतन कोणत्या कारणास्तव कमी करण्यात आले याची माहिती देण्यात यावी व कंत्राटी सेवक ठेकेदार (सिद्धिविनायक एन्टरप्रायजेस) यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून कामगारांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष सातव पाटील यांनी सहा आयुक्त संजय पोळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर रोड मनपा क्षेत्रीय कार्यालयाचे सहा आयुक्त संजय पोळ यांचे यांचेशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्यापासून कामगार कल्याण विभागाकडून विमा काढणे अनिवार्य केला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कामगारा प्रमाणेच कंत्राटी कामगारांचा सुद्धा विमा काढण्यात आला आहे. पंधरा लाखांचा विमा असून विम्याची रक्कम एकवेळच (वन टाईम) भरायची आहे. बारा महिने विम्यासाठी कुठलीही रक्कम वेतनामधून कपात करण्यात येणार नाही. नोव्हेंबर महिन्याचा कमी आलेला पगार सुद्धा सोमवारी देण्यात येईल.
– गणेश चौरे (कंत्राटी सेवक ठेकेदार)