साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कांचनपुरम सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
मनपा सहा. आयुक्तांकडे निवेदनाद्वारे उपाययोजना करण्याची मागणी
वाघोली : वाघोली येथील बायफ रोड परिसरात असलेली कांचनपुरम जी एच हाउसिंग सोसायटी जवळ मोठ्याप्रमाणावर साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी कांचनपुरम सोसायटीतील रहिवाशांनी लेखी निवेदनाद्वारे नगर रोड वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आयुक्त व नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांचेकडे केली आहे.
कांचनपुरम हाउसिंग सोसायटी वाघोलीतील बायफ रोड परिसरात असून सखल भागात आहे. पावसाचे पाणी नैसर्गिक नाल्यातून वाहत होते. परंतु सोसायटी शेजारील जागेवर कुणीतरी बांध टाकून पाणी अडवले. त्यामुळे सोसायटी भोवती मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरली असून सोसायटीतील पाचशे ते सहाशे रहिवाशांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांनी सोसायटीतील रहिवाशी ग्रस्त झाले आहेत. वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा आजारांची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी मच्छिंद्र सातव पाटील यांनी बिल्डरांच्या वर्गणीतून काम हाती घेतले होते. परंतु नंतर ते काम सुद्धा अपुरे झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आजूबाजूच्या सोसायटीतील ड्रेनेज लाईनची नसल्याने सांडपाणी सोडायचे कुठे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गेली अनेक दिवसांपासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी कांचनपुरम सोसायटीतील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मनपाचे आरोग्य निरीक्षक हनुमंत साळवे यांच्याशी संपर्क केला असता ड्रेनेजचा विभाग कनिष्ठ अभियंता वसंत शिंदे यांचेकडे असल्याचे सांगितले. वसंत शिंदे यांना संपर्क केला असता मुकादम दिपक वाघमारे यांना सदर ठिकाणी पाठवून परिस्थिती जाणून घेतो. त्यानंतर काय उपाययोजना करता येईल हे बघू असे शिंदे यांनी सांगितले.