अवघ्या चार तासांत हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पालकांच्या स्वाधीन
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी; वाघोलीतील बाईफ रोड परिसरातील घटना
वाघोली : वाघोली येथील बाईफ रोड परिसरामध्ये पालकांपासून हरवलेला तीन वर्षाच्या मुलाला गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सुखरूप ४ तासांच्या आत पालकांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस व नागरिकांनी मुलाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर पोलीस पालकांचा शोध घेत असताना सदरची बाब मुलाच्या आईला समजली आणि युनिट-६ च्या कार्यालयात मुलाची ओळख पटवून आईच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाईफ रोड परिसरामध्ये सोमवारी (दि.२ डिसेंबर) तीन वर्षाचा मुलगा सापडला असल्याची माहिती एका सतर्क महिलेने गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकास कळविली. पोलिसांनी मुलाला कार्यालयात आणले. त्याचा फोटो सोशल मिडीयावर पोलिसांनी व वाघोलीतील नागरिकांनी व्हायरल केला. पोलीस त्याच्या पालकांचा शोध घेत असताना अक्षय संस्कृती सोसायटी येथे एक महिला तिच्या मुलाचा शोध घेत असल्याचे कळाले. पोलिसांनी सदर महिलेस फोटो दाखवून खात्री करण्यात आली. युनिट-६ च्या कार्यालयात मुलाची ओळख पटवून आईच्या ताब्यात देण्यात आले.
हरवलेल्या बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सध्या सुरु असताना बाईफ रोडच्या हरवलेल्या मुलाबाबत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दाखवलेली दक्षता, सतर्क महिला व नागरिकांनी पोलिसांना केलेल्या सहकार्याचे सध्या कौतुक केले जात आहे.
सदरची कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोह रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, पोना कानिफनाथ कारखेले, पोअं ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.