Video : पुणे जिल्ह्यात ४ डिसेंबर रोजी जंतनाशक मोहीम
१ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींनी जंतनाशक गोळी घेण्याचे जि.प. आरोग्य विभागाचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुलामुलींसाठी जनताच्या आजाराचा सामना करण्यासाठी पुणे जिल्हा परिषेद आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी मोहीम राबवली जाणार आहे. परिसरातील शाळा व अंगणवाडी येथे जाऊन १ ते १९ वर्षे वयोगटातील शालाबाह्य मुलामुलींनी जंतनाशक गोळी आवश्यक घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, मनपा शाळा, सर्व खासगी अनुदानित शाळा, आर्मी स्कूल, सीबीएससी स्कूल, नवोदय विद्यालय, सुधारगृह, सर्व खासगी इंग्लिश शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकुल, संस्कार केंद्रे, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये, फार्मसी, डीएड, इंजिनिअरिंग महाविद्यालये, ग्रामीण व शहरी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी केंद्र आदी संस्थांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम बुधवारी (४ डिसेंबर) पुणे जिल्ह्यातील १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४४ उपकेंद्रा (आरोग्य मंदिर) अंतर्गत असणाऱ्या ५५७० शाळा, ४६९३ अंगणवाडी, १६५ महाविद्यालयामध्ये एकूण ११ लक्ष ६० हजार २७२ मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. पालकांनी १ ते १९ वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळी आवश्यक देवून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.