धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई
गुन्हे शाखा युनिट-६, लोणीकंद पोलीस व वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई

वाघोली : वाघोली-डोमखेल रोडवरील रायसोनी कॉलेज परिसरामध्ये दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्ण कर्कश आवाज करून धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकींवर गुन्हे शाखा युनिट सहा, लोणीकंद पोलीस व वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, महाविद्यालय परिसरात रोड रोमियो दुचाकी गाडयांचे सायलन्सर काढून कर्कश आवाज काढून धुमाकूळ घालत आहेत. धुमाकूळ घालणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी युनिट-६, लोणीकंद पोलीस व वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून विना परवाना, ट्रिपल सीट, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वाहन चालवणे अशा १६ केसेस केल्या आहेत. यामध्ये ३ बुलेट चालकांवर कर्ण कर्कश आवाज काढल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली विनाकारण महागड्या गाड्या घेवून फिरणाऱ्यांवर कॉलेज प्रशासनाची टीमसोबत शोध घेतला जाणार असून त्यांचेवर युनिट-६ व वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शाळा, महाविद्यालय परिसरात घिरट्या घालणाऱ्या रोड रोमियोंनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
शाळा, कॉलेज परिसरात विना परवाना, ट्रिपल सीट, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, भरधाव वाहन चालवणे, कर्ण कर्कश आवाज काढून धुमाकूळ घालणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांद्वारे गुन्हे शाखा युनिट-६, लोणीकंद पोलीस व वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई केली जाणार असून कारवाईमध्ये सातत्य ठेवले जाणार आहे.
– रजनीश निर्मल (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६)